Monday, December 27, 2010

शिवाजी - जिजामातेचे पुण्यात पुनरागमन -

१) सभासद बखर -" दादोजी कोंडदेवास पुणे परगणा सांभाळण्यास चौकीस ठेविला. तो बंगरुळला शहाजी महाराजांना भेटण्यास गेला असता शिवाजी व जिजाऊ ह्यांना त्या सोबत पाठविले . त्या वेळेस शिवाजी राजे १२ वर्षाचे होते, बरोबर शामराव निळकंठ म्हणून पेशवे, बाळकृष्णपंत , नारोपंत दीक्षितचे चुलत भाऊ- मुजूमदार म्हणून व सोनोपंत डबीर ; रघुनाथ बल्लाळ सबनीस असे देऊन शिवाजी महाराजांना पुण्यास पाठविले.."
चिकित्सा  ह्यात जे दादाजी बंगळूरला गेले असता शिवाजी महाराजांना त्या सोबत परत पाठविले असा उल्लेख आहे..दादोजी कोंडदेव पुण्यातून कर्नाटकात भरणा भरायला १६३९-१६४० च्या दरम्यान आले..तेव्हा शिवाजी महाराज ९-१० वर्षाचे होते.. त्यांच्याच (दादोजिंच्याच) पत्रा वरून दादोजी इ.स. १६४१-४२ मध्ये मावळातच होते ह्याचा दाखला मिळतो...आणि दुसरा विरोधाभास म्हणजे शहाजी महाराजांकडे बंगरूळ सुभा इ.स. १६४४ नंतर आला. ह्या पहिल्याच बखरीतील विपर्यस्त मजकुराने नंतरच्या लिखाणातून काल्पनिक चित्रांचा का व कसा उठाव झाला याचा उलगडा होण्यास कठीण पडणार नाही..

२) चित्रगुप्ताने - सभासदाचीच वाक्ये दिली आहेत. त्यात अधिक काल्पनिक माहिती घुसडली आहे, त्यात शहाजीचा भाऊ " शरीफजी मोगलाईत वजिरी करू लागले " असे दिलेले आहे.
व शहाजी राजे यांज कडे सरंजामात पुणे व इंदापूर हे दोन परगणे असोन दादाजी कोंडदेव म्हणोन कारकून ठेविले होते.."
चिकित्सा शरीफजी निजामशाहीत असतांना ए.स. १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत मारले गेले. आणि दुसरे पुणे व इंदापूर हे परगणे शहाजी महाराजा कडे सरंजाम म्हणून न्हवते तर जहागीर म्हणून होते.. आणि वरती दादोजी ह्यांच्या कडे हे दोन्ही परगणे दिल्याचे लिहिलेले आहे.. पण मुळात पुणे परगणाच फक्त दादाजी कडे होता.. इंदापूर त्यांच्या कडे न्हवता.. तो शहाजीचा म्हेवना संभाजी मोहिते याज कडे होता. अजूनही ह्या बखरीत रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐवजी रघुनाथ बोकील सबनीस असे लिहिलेले आहे.
३) शेडगावकर भोसलेंची बखर - ह्या बखरीतील वर्णना वरून शिवाजी महाराज पुण्यातच होते व ते कर्नाटकात गेलेच नाहीत असा समज निर्माण करणारा मजकूर आहे.

४) मराठी साम्राज्याची छोटी बखर - मुरार जगदेव विजापुरास गेले. त्या समागमे शहाजी राजेही गेले. दादाजी पंतांचे स्वाधीन मुलुख करून जाते समयी चिरंजीव व स्त्री शिवनेरीस आहेत. त्यांना आपल्यापाशी महाल बांधून उभयवंतास अन्न वस्त्र देऊन चीरंजीवास शहाणे करणे . व दादाजींनी त्या प्रमाणे लाल महाल (रंग महाल) बांधून त्यांना पुण्यात आणून आपल्या सन्निध ठेवले... पुढे हा बखरकार लिहितो...
ह्याउपरी जाधवराव याचे रागे करून शहाजी महाराजांनी दुसरे लग्न केले. राजे(शहाजी) यांनी मोहिते यांची कन्या केली, .. जिजाऊ व शिवाजी यांचा त्याग केला.. मुख पाहणार नाही म्हणून बोलिले. राजश्री दादाजी पंतांनी पुनियामध्ये मर्यादेने जिजा बाईचे चालविले. शिवबास पंतोजी ठेविले " " पुढे ह्या बखरकाराने दादाजी पंतांनी कसबे शिवापूर बसवले पातशाही झाडे इरसाल शहाजी राजे यांचे नावे लावून त्याचा एक आंबा घेतला होता म्हणून आपला हात तोडीत होते. मग लोकांनी अर्ज करून असतानी कमी केले हे वर्तमान शहाजी राजे यास विदित झाले,. त्याने शिरपाव पाठविले तेव्हा अस्तनी दूर केली "
चिकित्सा = मुरार जगदेवाचा संबंध १६३३ च्या सुमाराचा..आणखी त्याआधी १६३० ला तर शहाजी महाराजां विरोधीच मुरार जगदेवने पुण्याची राख रांगोळी केली..जी १६३६ ला शहाजी महाराज विजापुरी गेले ते रणदुल्लाखाना बरोबर..शहाजी महाराजांनी पुणे परगण्यासाठी मुतालिक म्हणून तर रणदुल्लाखानाने कोंढाणा किल्ल्यावर सुभेदार म्हणून दादाजीची निवड केली होती...बाकी १६३७ मध्ये दादाजीने बांधलेल्या खेड शिवपुरी वाड्यात वर्षभर शिवाजी जिजाऊ होते, मग कंपिलीला शहाजी महराजांकडे गेले.. व नंतर १६४२ च्या उत्तरार्धात पुण्यात परत आले..
बखरकाराने खूपच काळ विपर्यास केलेला आहे त्या मूळे या प्रसंगामागील कार्यकारण भाव सहजच अवास्तव आलेला आहे. इतेच न्हवे तर त्यामुळे एका घाणेरड्या व हीन नीतिमत्तेच्या काल्पनिक चित्राला रेखाटण्यास या कथाथाटी लेखकाला अवसर मिळाला. शहाजी महाराजांचे दुसरे लग्न इ.स. १६२६ पूर्वीच झाले होते. त्यानंतर जाधवराव १६२९ मध्ये मारले गेले. त्यामुळे शहाजी राजे आपल्या जिजाई- संभाजी- शिवाजीसह इ.स. १६३६ पर्यंत एकत्र होते. या लग्नानंतर एकटे शिवाजीच जन्माला आले असे नाही तर एक मुलगीही झाली. इ.स. १६३७ ते १६४२ पर्यंत जिजाऊ व शहाजी राजे पुन्हा कर्नाटकात एकत्र होते. इ.स. १६४१-२ मध्ये शिवाजीचे फलटनकर नाईक निंबाळकर पवारांच्या मुलीशी लग्न लावून देऊन सई बाईंचे सुनमुखही पहिले. त्यामुळे वरील बखरीतील कथेकरी हिडीस कल्पनेला कवडीचाही आधार नाही. परंतु या लेखन काळात पतीपत्नी वर असली हिडीस स्वरुपाची आचार आचरणूक लादून श्रोत्यांचे मनोरंजन करण्याचा पाठपुरावा पडून गेलेला दिसतो.
तसेच दादाजीची जी बाही कापली ती बाजी घोरापड्याने इ.स. १६४३ मध्ये कापली. मुळात आंब्याची बाग दादाजीच्या मृत्यू नंतर लावण्यात आली. त्यावेळी खेड्यात आंबे विक्री होत न्हवती आणि शिवापूरच्या आंब्याची बाग गावकऱ्यांना त्यावेळी मोकळी असतांना मूळ कारण सोडून दादाजीची नीतीमत्तेची कथा रचण्यात वास्तव वादी बोध कसा साधणार??
सारांश ह्या बखरकाराला शिवाजीच्या पुनरागमनाची यत्किंचितही कल्पना नसल्याने त्याने भरमसाठ व सामान्य व्यवहारालाही न पटणारा असा मजकूर दिला आहे. 
५) एक्याण्णव कलमी बखर - ह्या प्रसंग बाबतचा मजकूर अक्षरशः मराठा साम्राज्याची छोटी बखर सारखाच आहे. त्यात जो काही इतर मजकूर या उल्लेखात मिसळला आहे तो तर काळाच्या दृष्टीने अधिकच विपर्यस्त अतएव काल्पनिक आहे.
६ ) न्याय शास्त्री पंडित राव बखर - कर्नाटकात जाऊन परत आल्या बाबतचा काहीच उल्लेख आलेला नाही.
७) चिटणीस बखर -.."शहाजी राजे व मुरार जगदेव ह्यांनी विजापुरास परत जाण्याचा निश्चय केला असता, जिजाऊ गरोदर असल्याकारणे त्यांना शिवनेरीस ठेविले. तिथे शिवाजी राजे पुत्र जाहिले. ७ वर्षांनी शिवरायांचे मुखावलोकन केले, पुत्र संभाजी राजे युद्धी पडले, राज्यास अधिकारी पुत्र हा म्हणून बोलावणे पाठवून बहुत उत्सव केला. नंतर मुरार जगदेव राव यांनी राजे यांचा पराक्रम पादशाहास निवेदन केला. फार तारीफ केली. आणि पुणे , सुपे, बारामती, इंदापूर बारा मावळे सरंजाम दिला. त्याचा कारभार शिवनेरी दादाजी कोंडदेव होते त्याजकडे सांगितला, इकडे महाराज शहाजी राजे यांनी शिवाजी राजे विजापुरी नेलीयासी .. व जेष्ट दौलतीस अधिकारीही हेच म्हणून कृतनिश्चय करिते झाले.. नंतर पंत (मुरार जगदेव ) यास हे वर्तमान याचे चरित्र बोलणे असे पडिले, आम्ही प्रयत्न जितका करावयाचा तितका केला, याज करिता प्रौढ होत तो लांब ठेवितो सांगितले. यांनीही सलाह दिल्हा आणि तारीफ केली, त्या समयी शिवाजी महाराज यांचे लग्न शिर्के यांची कन्या करून समारंभ केले. नाव सईबाई असे ठेविले , आणि विचार करून दादाजी कोंडदेव सुभेदार पुणे वगैरे येथील मोहसब देण्यास आले असता, त्यास ठेऊन पुण्यास जिजाबाईसाहेब व राजे बरोबर देऊन रवाना केले. शके १५५९ (इ.स. १६३७) बरोबर कारभारी पूर्वी शिवनेरीस होते ते दिल्हे...पुण्याला गेल्यावर दादाजी पंतांनी रंग महाल म्हणून वाडा बांधिला तेथे शिवाजी महाराज वास्तव करू लागले,.. एके दिवशी दादाजी पंतांनी हातांनी सरकार बागेतील पाडीचा आंबा महाराजांचे स्वारी बरोबर असता तोडला, आणि आपणच आम्ही स्वामीचे अज्ञे खेरीज हा विचार केला म्हणोन शासन असावे, हात तोडावा बोलिले, आणि तोडावयास चाकर यांना सांगितले..मग महाराजांनी हे करणे श्रेयस्कर नाही, तुम्ही मालकच आहात असे म्हटले, त्यावरून पंतांनी अस्तनी अंगाराखीयाची कापून लंडी केली " 
चिकित्सा =
...ह्यास मुरार जगदेव केव्हा मारला गेला वगैरेची माहिती नसल्याने त्यांनी आपल्या " श्री शिव छत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्रात" काल निश्चितीच्या दृष्टीने फारच गोंधळ केला आहे. " शिवाजी बापाबरोबर विजापुरी राहत न्हवता तर कंपिलीत राहत होता हे माहित नसल्याने गाईच्या मासाची दुकाने , त्याचे दरबारातील वागणे, रामदासांचे नावही ऐकण्यापूर्वी " राम राम" म्हणणे वगैरे भाकड कथा दिल्या आहेत. त्या सर्व पूर्ण काल्पनिक आहेत. ;; मुरार जगदेवाचा बखरीतील उल्लेख चुकीचा आहे. मुरार जगदेवास आदीच आदिलशाहने मारले होते. तसाच शिवाजीचा वडील बंधू संभाजीचा उल्लेख चुकीचा आहे... वडील बंधू संभाजीस पहिला पुत्र १६५४ ला झाला. व त्यांचा मृत्यू १६६३ मधील आहे. तेव्हा संभाजी महाराज मारले गेल्यामुळे शिवाजी जेष्ठ वारसदार झाले म्हणून त्याचेबद्दल केलेला उठाव हा भ्रम मूल आहे. शिवाजीचा वडील बंधू जिवंत असतांना व कार्यकारी असतांना शिवाजीला कंपिलीहून विजापुरी दरबारी नेल्याचे वृत्त लेखकाचे वस्तुस्थितीचे पूर्ण अज्ञान असल्याची ग्वाही देते. दादाजी कोंडदेवाच्या आंब्याच्या काल्पनिक कथेबद्दल आधी चिकित्सा आलेलीच आहे. शिवापुराचा आंब्याच्या बाग ज्यांनी पहिली असेल त्याला एका (रायवळ) आंब्याला दिलेले महत्व अज्ञान मूलक असल्याचे पटल्याशिवाय राहणार नाही. शिवाय ती बाग अस्तित्वात न्हवती हि गोष्ट वेगळीच.
सईबाई शिर्क्यांकडील नसून निंबाळकर पवारांकडील होती.
८) शिव दिग्विजय -
..चिटणीस बखरीचे वर्णन ह्याने जसे च्या तसे दिलेले आहे...फक्त बदल असा दिलेला आहे - दादोजीन बरोबर शिवाजीला पाठविले तेव्हा त्यांचे वय ८ होते. व मुरार जगदेव ऐवजी रणदुल्लाखानाचे नाव तसेच सोनोपंता ऐवजी निळो पंतांचे नाव दिले आहे. आणि अण्णाजी दत्तो चे नाव त्यात अधिक दिलेले आहे.....
चिकित्सा = सबाजी अनंत, मलिक अंबर, मुरार पंत, मीर जुमला, वगैरेंचे संबंध गुंतागुंतीचे करून ठेविले आहेत, कि ज्या मूळे लेखकाला काल निश्चिती बद्दल पूर्ण आले पाहिजे व ऐकीव दंत कथांची जुळणी मन मानेल तशी करने एवढाच याचा उद्देश असावा असे मानणे भाग पडते. यात संभाजी महाराज (शिवाजी महाराजांचे वडील बंधू ) ८ वर्षाचे असतांना कनकगीरीत मारले गेले असे धरले आहे. ते साफ चुकीचे आहे.. चिटणीस बखरितला जो उल्लेख जसा च्या तसा घेतला आहे त्याचे विश्लेषण वर आलेलेच आहे.. सोनोपंताच्या ऐवजी निळोपंतांचे नाव चुकीचे आहे...आणि अण्णाजी दत्तोचेही नाव पूर्णपणे चुकून आलेले दिसते मूळ नावे विसरलेली गेली आहेत.
..
सारांश, बखरकारांना शिवाजीच्या कर्नाटकात जाण्याच्या व परत पुण्यात येण्याच्या कार्यकारणभाव बद्दल पूर्ण अज्ञान होते यात शंका नाही.

आत्ता शकावल्या व तत्कालीन इतर साधनांचा विचार करू...
..
१) जेधे शकावली - शके १५५७ (१६३५-३६) शहाजी राजे भोसले इदलशाहीत गेले. पुणे दादोजीन कडे कारभारास दिले... तेव्हा सोन्याचा नांगर पंढरीवर धरला. शांती केली, मग सुभेदार यांनी कसब्याची व गावगन्नाची प्रांतात वस्ती केली. कौलाचे वर्ष दिल्हे. सहावे साली (१६४२-४३) तनखा घेतला. राजे विजापूर प्रांती गेले. "
जेधे करीना - त्यात ह्याचेच वर्णन जास्त आले आहे.. त्यात आदिलशाहीत येण्याच्या वेळेस.. दादोजी आणि जेधे, शहाजी महाराजांना भेटले तेव्हा जेधेंनी आपल्याला आदिलशहा कडे मागून घेण्याची मागणी केली, त्या प्रमाणे झाले.. व जेधे शहाजीमहाराजांबरोबर गेले..नंतर रणदुल्लाखान वारला.. त्यास पुत्र न्हवता म्हणून त्याची दौलत कर्ता म्हणून अफझल खानाकडे गेली..मग शहाजी महाराज चंदीस गेले.. तिथल्या मऱ्हाठ्यांचे आणि शहाजी राज्यांचा घरोबा आहे म्हणून राजे त्यांना सामान पुरवितात असे कारण मुस्ताफाखानास लिहुन शहाजी महाराजास विजापुरास धरून नेले...तहकिकात केल्यावर.. पातशाहाने शहाजी महाराजांचा सत्कार केला.व सदर बक्षीस दिली...बंगरूळ प्रांताची वेगळी मसलत सांगितली, शिरपाव दिल्हे.., त्यावरी शहाजी महाराजांनी राजश्री शिवाजी महाराजांना राजश्री सामराज पंत पेशवे व माणकोजी दहातोंडे सरनोबत व बाळाजी हरी मजलासी व कारकून व स्वारांचा जमाव देऊन पुण्यास पाठविले .
चिकित्सा = वरील वर्णनात रणदुल्ला खानाचा मुलगा न्हवता एवढाच गैरसमज दिसतो.. रणदुल्लाखानास रुस्तुमजमा नावाचा मुलगा होता. त्याला नालायक ठरवून कोकणात छोटीशी जहागीर देऊन अफजल खानाने रणदुल्लाखानची सगळी जहागीर आपल्याकडे घेतली...
२) कवींद्र परमानंदांच्या "अनुपुरान" - शहाजीच्या स्त्रिया बऱ्याच असूनही संभाजी, शिवाजी आणि जिजाऊ ने शहाजीचे हृदय काबीज केले होते... संभाजी पेक्षा शिवाजी वयाने धाकटा पण गुणाने फार मोठा म्हणून त्याज वर.. शहाजी महाराजांचा फार जीव होता... जेव्हा हा पुत्र झाला तेव्हा पासून ऐश्वर्य वृद्धींगतच होत होते...मग तो गुणवान मुलगा सात वर्षाचा झालेला पाहून तो मुळाक्षरे शिकण्यास योग्य झाला आहे असे शहाजी राजास वाटले. प्रधानांच्या समवयस्क पुत्रासह बुद्धिमान आणि स्पष्टोच्चार करणाऱ्या त्या पुत्राला गुरूच्या मांडीवर बसविले. गुरुजी जो पहिले अक्षर लिहिण्यास सांगतात तोच हा मुलगा दुसरे अक्षरसुद्धा लीहून दाखवीत असे. जेव्हा शिवाजीस बारावे वर्ष लागले तेव्हा दूरदर्शी शहाजींनी शिवाजीस बोलावून पुणे प्रांतावर अधिकारी नेमले नंतर काही हत्ती, घोडे व पाय दळ, पिदिजाद व विश्वासू अमात्य, त्याच प्रमाणे विख्यात अध्यापक, बिरुदे, उंच ध्वज, विपुल द्रव्य, त्याच प्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे दुसरे परिजन या समवेत त्या पुण्यशील शहाजी राजाने शुभदिनी पुणे प्रांती पाठविले .
३) मुधोळ संस्थानाचे घोरपडे यांची बखर - कंपिली बद्दल मजकूर आढळतो -  
४) जयराम पिंडे याच्या राधा विलास चंपू काव्यात -जिजाऊ - शिवाजीचा फारसा उल्लेख नाही. कारण हि दोघे पुणे जहागिरीत त्यावेळी आलेली होती. परंतु ग्रंथाच्या शेवटच्या भागात महत्व पूर्ण उल्लेख आलेला आहे..
.. - जसी चंपकेशी खुले फुलाजी| भली शोभली त्यास जाया जिजाई || जिचे कीर्तीचा चंबू जम्बुद्धीपाला | करी साउली माउलीसी मुलाला || ९६|| असो सर्वसाम्राज्यलक्ष्मी जयाची | तसी दुसरी श्री महाराजीयाची (शहाजी महाराज) || जिणे निर्मिलीसे असी एक पोहे| जिच्या नित्य दानोदकी विश्व पोहे ||९७|| टीकेचा धनी लेक ज्याचा शिवाजी | करी तो चहु पातशहाशी बाजी || तयाला रणामाजी हे एक माने | अरी जै गला घालूनी ये कमाने ||९९||"
.                   यावरून शहाजी - जिजाई यांचे भांडण न्हवते व शहाजीने जिजाई व शिवाजी यांचा त्याग केलेला न्हवता यात शंका उरत नाही. उलट संकटात पडलेल्या आपल्या धाकट्या मुलाला जवळचा आधार व मार्गदर्शक म्हणून शहाजीला आपल्यापासून तिला दूर करावी लागली होती. आणि तीही पत्नी व माता म्हणून तिच्यावर असलेली जवाबदारी पार पाडण्याकरिता पती विग्रहाला तयार झाली होती. 
५) शिवाजीस समकालीन कॉस्मा द गार्डा -
.." Life of the celebrated sevagy" - " sevagy had not completed twelve when his father gave him the command of 30 horses .... as sevagy was so young , he gave him as his tutor an old soldier and near relative salled neotogy... who kenw that sevagy was not only quick in action but liveli in carriage also, for with a clear and fair face, nature had given him the greatest perfections. specially the dark big eye......."
                               शिवाजी राज्यांना पुण्यास केव्हा पाठविले त्या बद्दल काही निरनिराळे समज आहेत. काही बखरकार सांगतात कि, दादोजी कोंडदेव कर्नाटकात भरणा करावयास गेले तेव्हा त्यांचे बरोबर शहाजी महाराजांनी शिवाजी - जिजाईस पाठविले. दादाजी कोंडदेव महजर व पत्रे २६ जानेवारी १६३८ ते २८ सप्टेबर १६३९ पर्यंतची उपलब्ध झालेली आहेत. त्यावरून या अवकाशात दादाजी आपल्या सुभावर मावळतच होते असे स्पष्ट होते. त्यानंतर २४ नवेंबरच्या फार्मानावरून इ.स. १६३९ च्या पावसाळ्या नंतर ते निघाले असावेत असे अनुमान काढणे भाग पडते. त्या नंतर दादाजीचा पत्र व्यवहार वगैरे इ.स. १६४० तील अद्यापि आढळलेला नाही. परंतु ते १६४० च्या पावसाळ्यानंतर मावळत आले असावेत. कारण पुन्हा इ.स. १६४१ च्या १४ जानेवारी पासून २१ मे १६४३ पर्यंतची पत्रे उपलब्ध आहेत. यावरून शिवाजी आपल्या बाराव्या वर्ष पर्यंत कर्नाटकात असल्याने ते दादाजी कोंडदेव बरोबर १६४० च्या अखेरपर्यंत तरी खास आलेले नाहीत. तसेच ज्या अर्थी शिवाजी राजा बरोबर मोठमोठे कारकून सेनापती पाठीवले होते त्या अर्थी दादाजी पंताच्या सोबतीचीही जरूर न्हवती. अर्थात शिवाजी- जिजाई यांना दादाजी कोंडादेवा बरोबर पाठविले हि केवळ काल्पनिक माहिती आहे. अर्थात ती चुकीची आहे.१६४३ नंतर शिवरायांची पत्रे आढळतात..ती त्यांच्या शिक्क्या निशी आहे..त्या अर्थी तो शिक्का जहागिरीवर नेमणूक करीत आहे या सबबीवर शिवाजीला मिळवून दिला असे होते. 
१६४२ च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का, झेंड्यासोबत...पेशवे, मुजुमदार, सबनीस, व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले...
अजूनही ज्यांना विस्तारित माहिती हवी असेल त्यांनी
श्री छत्रपती शिवाजी महाराज - वा .सी. बेंद्रे ह्यांच्या पुस्तकातील "शिवाजी - जीजामातेचे पुण्यात पुनरागमन " हे प्रकरण वाचावे.. त्यात सखोल चिकित्सा आलेली आहे.. पान क्रमांक ३७ ते ५३ - १६-१७ पाने निव्वळ ह्या विषया संबंधी चिकित्सा आलेली आहे.. जाणकारांनी स्वतः वाचून बघावे...   

 

No comments:

Post a Comment