Monday, December 27, 2010

शिवाजी - जिजामातेचे पुण्यात पुनरागमन -

१) सभासद बखर -" दादोजी कोंडदेवास पुणे परगणा सांभाळण्यास चौकीस ठेविला. तो बंगरुळला शहाजी महाराजांना भेटण्यास गेला असता शिवाजी व जिजाऊ ह्यांना त्या सोबत पाठविले . त्या वेळेस शिवाजी राजे १२ वर्षाचे होते, बरोबर शामराव निळकंठ म्हणून पेशवे, बाळकृष्णपंत , नारोपंत दीक्षितचे चुलत भाऊ- मुजूमदार म्हणून व सोनोपंत डबीर ; रघुनाथ बल्लाळ सबनीस असे देऊन शिवाजी महाराजांना पुण्यास पाठविले.."
चिकित्सा  ह्यात जे दादाजी बंगळूरला गेले असता शिवाजी महाराजांना त्या सोबत परत पाठविले असा उल्लेख आहे..दादोजी कोंडदेव पुण्यातून कर्नाटकात भरणा भरायला १६३९-१६४० च्या दरम्यान आले..तेव्हा शिवाजी महाराज ९-१० वर्षाचे होते.. त्यांच्याच (दादोजिंच्याच) पत्रा वरून दादोजी इ.स. १६४१-४२ मध्ये मावळातच होते ह्याचा दाखला मिळतो...आणि दुसरा विरोधाभास म्हणजे शहाजी महाराजांकडे बंगरूळ सुभा इ.स. १६४४ नंतर आला. ह्या पहिल्याच बखरीतील विपर्यस्त मजकुराने नंतरच्या लिखाणातून काल्पनिक चित्रांचा का व कसा उठाव झाला याचा उलगडा होण्यास कठीण पडणार नाही..

२) चित्रगुप्ताने - सभासदाचीच वाक्ये दिली आहेत. त्यात अधिक काल्पनिक माहिती घुसडली आहे, त्यात शहाजीचा भाऊ " शरीफजी मोगलाईत वजिरी करू लागले " असे दिलेले आहे.
व शहाजी राजे यांज कडे सरंजामात पुणे व इंदापूर हे दोन परगणे असोन दादाजी कोंडदेव म्हणोन कारकून ठेविले होते.."
चिकित्सा शरीफजी निजामशाहीत असतांना ए.स. १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत मारले गेले. आणि दुसरे पुणे व इंदापूर हे परगणे शहाजी महाराजा कडे सरंजाम म्हणून न्हवते तर जहागीर म्हणून होते.. आणि वरती दादोजी ह्यांच्या कडे हे दोन्ही परगणे दिल्याचे लिहिलेले आहे.. पण मुळात पुणे परगणाच फक्त दादाजी कडे होता.. इंदापूर त्यांच्या कडे न्हवता.. तो शहाजीचा म्हेवना संभाजी मोहिते याज कडे होता. अजूनही ह्या बखरीत रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐवजी रघुनाथ बोकील सबनीस असे लिहिलेले आहे.
३) शेडगावकर भोसलेंची बखर - ह्या बखरीतील वर्णना वरून शिवाजी महाराज पुण्यातच होते व ते कर्नाटकात गेलेच नाहीत असा समज निर्माण करणारा मजकूर आहे.

४) मराठी साम्राज्याची छोटी बखर - मुरार जगदेव विजापुरास गेले. त्या समागमे शहाजी राजेही गेले. दादाजी पंतांचे स्वाधीन मुलुख करून जाते समयी चिरंजीव व स्त्री शिवनेरीस आहेत. त्यांना आपल्यापाशी महाल बांधून उभयवंतास अन्न वस्त्र देऊन चीरंजीवास शहाणे करणे . व दादाजींनी त्या प्रमाणे लाल महाल (रंग महाल) बांधून त्यांना पुण्यात आणून आपल्या सन्निध ठेवले... पुढे हा बखरकार लिहितो...
ह्याउपरी जाधवराव याचे रागे करून शहाजी महाराजांनी दुसरे लग्न केले. राजे(शहाजी) यांनी मोहिते यांची कन्या केली, .. जिजाऊ व शिवाजी यांचा त्याग केला.. मुख पाहणार नाही म्हणून बोलिले. राजश्री दादाजी पंतांनी पुनियामध्ये मर्यादेने जिजा बाईचे चालविले. शिवबास पंतोजी ठेविले " " पुढे ह्या बखरकाराने दादाजी पंतांनी कसबे शिवापूर बसवले पातशाही झाडे इरसाल शहाजी राजे यांचे नावे लावून त्याचा एक आंबा घेतला होता म्हणून आपला हात तोडीत होते. मग लोकांनी अर्ज करून असतानी कमी केले हे वर्तमान शहाजी राजे यास विदित झाले,. त्याने शिरपाव पाठविले तेव्हा अस्तनी दूर केली "
चिकित्सा = मुरार जगदेवाचा संबंध १६३३ च्या सुमाराचा..आणखी त्याआधी १६३० ला तर शहाजी महाराजां विरोधीच मुरार जगदेवने पुण्याची राख रांगोळी केली..जी १६३६ ला शहाजी महाराज विजापुरी गेले ते रणदुल्लाखाना बरोबर..शहाजी महाराजांनी पुणे परगण्यासाठी मुतालिक म्हणून तर रणदुल्लाखानाने कोंढाणा किल्ल्यावर सुभेदार म्हणून दादाजीची निवड केली होती...बाकी १६३७ मध्ये दादाजीने बांधलेल्या खेड शिवपुरी वाड्यात वर्षभर शिवाजी जिजाऊ होते, मग कंपिलीला शहाजी महराजांकडे गेले.. व नंतर १६४२ च्या उत्तरार्धात पुण्यात परत आले..
बखरकाराने खूपच काळ विपर्यास केलेला आहे त्या मूळे या प्रसंगामागील कार्यकारण भाव सहजच अवास्तव आलेला आहे. इतेच न्हवे तर त्यामुळे एका घाणेरड्या व हीन नीतिमत्तेच्या काल्पनिक चित्राला रेखाटण्यास या कथाथाटी लेखकाला अवसर मिळाला. शहाजी महाराजांचे दुसरे लग्न इ.स. १६२६ पूर्वीच झाले होते. त्यानंतर जाधवराव १६२९ मध्ये मारले गेले. त्यामुळे शहाजी राजे आपल्या जिजाई- संभाजी- शिवाजीसह इ.स. १६३६ पर्यंत एकत्र होते. या लग्नानंतर एकटे शिवाजीच जन्माला आले असे नाही तर एक मुलगीही झाली. इ.स. १६३७ ते १६४२ पर्यंत जिजाऊ व शहाजी राजे पुन्हा कर्नाटकात एकत्र होते. इ.स. १६४१-२ मध्ये शिवाजीचे फलटनकर नाईक निंबाळकर पवारांच्या मुलीशी लग्न लावून देऊन सई बाईंचे सुनमुखही पहिले. त्यामुळे वरील बखरीतील कथेकरी हिडीस कल्पनेला कवडीचाही आधार नाही. परंतु या लेखन काळात पतीपत्नी वर असली हिडीस स्वरुपाची आचार आचरणूक लादून श्रोत्यांचे मनोरंजन करण्याचा पाठपुरावा पडून गेलेला दिसतो.
तसेच दादाजीची जी बाही कापली ती बाजी घोरापड्याने इ.स. १६४३ मध्ये कापली. मुळात आंब्याची बाग दादाजीच्या मृत्यू नंतर लावण्यात आली. त्यावेळी खेड्यात आंबे विक्री होत न्हवती आणि शिवापूरच्या आंब्याची बाग गावकऱ्यांना त्यावेळी मोकळी असतांना मूळ कारण सोडून दादाजीची नीतीमत्तेची कथा रचण्यात वास्तव वादी बोध कसा साधणार??
सारांश ह्या बखरकाराला शिवाजीच्या पुनरागमनाची यत्किंचितही कल्पना नसल्याने त्याने भरमसाठ व सामान्य व्यवहारालाही न पटणारा असा मजकूर दिला आहे. 
५) एक्याण्णव कलमी बखर - ह्या प्रसंग बाबतचा मजकूर अक्षरशः मराठा साम्राज्याची छोटी बखर सारखाच आहे. त्यात जो काही इतर मजकूर या उल्लेखात मिसळला आहे तो तर काळाच्या दृष्टीने अधिकच विपर्यस्त अतएव काल्पनिक आहे.
६ ) न्याय शास्त्री पंडित राव बखर - कर्नाटकात जाऊन परत आल्या बाबतचा काहीच उल्लेख आलेला नाही.
७) चिटणीस बखर -.."शहाजी राजे व मुरार जगदेव ह्यांनी विजापुरास परत जाण्याचा निश्चय केला असता, जिजाऊ गरोदर असल्याकारणे त्यांना शिवनेरीस ठेविले. तिथे शिवाजी राजे पुत्र जाहिले. ७ वर्षांनी शिवरायांचे मुखावलोकन केले, पुत्र संभाजी राजे युद्धी पडले, राज्यास अधिकारी पुत्र हा म्हणून बोलावणे पाठवून बहुत उत्सव केला. नंतर मुरार जगदेव राव यांनी राजे यांचा पराक्रम पादशाहास निवेदन केला. फार तारीफ केली. आणि पुणे , सुपे, बारामती, इंदापूर बारा मावळे सरंजाम दिला. त्याचा कारभार शिवनेरी दादाजी कोंडदेव होते त्याजकडे सांगितला, इकडे महाराज शहाजी राजे यांनी शिवाजी राजे विजापुरी नेलीयासी .. व जेष्ट दौलतीस अधिकारीही हेच म्हणून कृतनिश्चय करिते झाले.. नंतर पंत (मुरार जगदेव ) यास हे वर्तमान याचे चरित्र बोलणे असे पडिले, आम्ही प्रयत्न जितका करावयाचा तितका केला, याज करिता प्रौढ होत तो लांब ठेवितो सांगितले. यांनीही सलाह दिल्हा आणि तारीफ केली, त्या समयी शिवाजी महाराज यांचे लग्न शिर्के यांची कन्या करून समारंभ केले. नाव सईबाई असे ठेविले , आणि विचार करून दादाजी कोंडदेव सुभेदार पुणे वगैरे येथील मोहसब देण्यास आले असता, त्यास ठेऊन पुण्यास जिजाबाईसाहेब व राजे बरोबर देऊन रवाना केले. शके १५५९ (इ.स. १६३७) बरोबर कारभारी पूर्वी शिवनेरीस होते ते दिल्हे...पुण्याला गेल्यावर दादाजी पंतांनी रंग महाल म्हणून वाडा बांधिला तेथे शिवाजी महाराज वास्तव करू लागले,.. एके दिवशी दादाजी पंतांनी हातांनी सरकार बागेतील पाडीचा आंबा महाराजांचे स्वारी बरोबर असता तोडला, आणि आपणच आम्ही स्वामीचे अज्ञे खेरीज हा विचार केला म्हणोन शासन असावे, हात तोडावा बोलिले, आणि तोडावयास चाकर यांना सांगितले..मग महाराजांनी हे करणे श्रेयस्कर नाही, तुम्ही मालकच आहात असे म्हटले, त्यावरून पंतांनी अस्तनी अंगाराखीयाची कापून लंडी केली " 
चिकित्सा =
...ह्यास मुरार जगदेव केव्हा मारला गेला वगैरेची माहिती नसल्याने त्यांनी आपल्या " श्री शिव छत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्रात" काल निश्चितीच्या दृष्टीने फारच गोंधळ केला आहे. " शिवाजी बापाबरोबर विजापुरी राहत न्हवता तर कंपिलीत राहत होता हे माहित नसल्याने गाईच्या मासाची दुकाने , त्याचे दरबारातील वागणे, रामदासांचे नावही ऐकण्यापूर्वी " राम राम" म्हणणे वगैरे भाकड कथा दिल्या आहेत. त्या सर्व पूर्ण काल्पनिक आहेत. ;; मुरार जगदेवाचा बखरीतील उल्लेख चुकीचा आहे. मुरार जगदेवास आदीच आदिलशाहने मारले होते. तसाच शिवाजीचा वडील बंधू संभाजीचा उल्लेख चुकीचा आहे... वडील बंधू संभाजीस पहिला पुत्र १६५४ ला झाला. व त्यांचा मृत्यू १६६३ मधील आहे. तेव्हा संभाजी महाराज मारले गेल्यामुळे शिवाजी जेष्ठ वारसदार झाले म्हणून त्याचेबद्दल केलेला उठाव हा भ्रम मूल आहे. शिवाजीचा वडील बंधू जिवंत असतांना व कार्यकारी असतांना शिवाजीला कंपिलीहून विजापुरी दरबारी नेल्याचे वृत्त लेखकाचे वस्तुस्थितीचे पूर्ण अज्ञान असल्याची ग्वाही देते. दादाजी कोंडदेवाच्या आंब्याच्या काल्पनिक कथेबद्दल आधी चिकित्सा आलेलीच आहे. शिवापुराचा आंब्याच्या बाग ज्यांनी पहिली असेल त्याला एका (रायवळ) आंब्याला दिलेले महत्व अज्ञान मूलक असल्याचे पटल्याशिवाय राहणार नाही. शिवाय ती बाग अस्तित्वात न्हवती हि गोष्ट वेगळीच.
सईबाई शिर्क्यांकडील नसून निंबाळकर पवारांकडील होती.
८) शिव दिग्विजय -
..चिटणीस बखरीचे वर्णन ह्याने जसे च्या तसे दिलेले आहे...फक्त बदल असा दिलेला आहे - दादोजीन बरोबर शिवाजीला पाठविले तेव्हा त्यांचे वय ८ होते. व मुरार जगदेव ऐवजी रणदुल्लाखानाचे नाव तसेच सोनोपंता ऐवजी निळो पंतांचे नाव दिले आहे. आणि अण्णाजी दत्तो चे नाव त्यात अधिक दिलेले आहे.....
चिकित्सा = सबाजी अनंत, मलिक अंबर, मुरार पंत, मीर जुमला, वगैरेंचे संबंध गुंतागुंतीचे करून ठेविले आहेत, कि ज्या मूळे लेखकाला काल निश्चिती बद्दल पूर्ण आले पाहिजे व ऐकीव दंत कथांची जुळणी मन मानेल तशी करने एवढाच याचा उद्देश असावा असे मानणे भाग पडते. यात संभाजी महाराज (शिवाजी महाराजांचे वडील बंधू ) ८ वर्षाचे असतांना कनकगीरीत मारले गेले असे धरले आहे. ते साफ चुकीचे आहे.. चिटणीस बखरितला जो उल्लेख जसा च्या तसा घेतला आहे त्याचे विश्लेषण वर आलेलेच आहे.. सोनोपंताच्या ऐवजी निळोपंतांचे नाव चुकीचे आहे...आणि अण्णाजी दत्तोचेही नाव पूर्णपणे चुकून आलेले दिसते मूळ नावे विसरलेली गेली आहेत.
..
सारांश, बखरकारांना शिवाजीच्या कर्नाटकात जाण्याच्या व परत पुण्यात येण्याच्या कार्यकारणभाव बद्दल पूर्ण अज्ञान होते यात शंका नाही.

आत्ता शकावल्या व तत्कालीन इतर साधनांचा विचार करू...
..
१) जेधे शकावली - शके १५५७ (१६३५-३६) शहाजी राजे भोसले इदलशाहीत गेले. पुणे दादोजीन कडे कारभारास दिले... तेव्हा सोन्याचा नांगर पंढरीवर धरला. शांती केली, मग सुभेदार यांनी कसब्याची व गावगन्नाची प्रांतात वस्ती केली. कौलाचे वर्ष दिल्हे. सहावे साली (१६४२-४३) तनखा घेतला. राजे विजापूर प्रांती गेले. "
जेधे करीना - त्यात ह्याचेच वर्णन जास्त आले आहे.. त्यात आदिलशाहीत येण्याच्या वेळेस.. दादोजी आणि जेधे, शहाजी महाराजांना भेटले तेव्हा जेधेंनी आपल्याला आदिलशहा कडे मागून घेण्याची मागणी केली, त्या प्रमाणे झाले.. व जेधे शहाजीमहाराजांबरोबर गेले..नंतर रणदुल्लाखान वारला.. त्यास पुत्र न्हवता म्हणून त्याची दौलत कर्ता म्हणून अफझल खानाकडे गेली..मग शहाजी महाराज चंदीस गेले.. तिथल्या मऱ्हाठ्यांचे आणि शहाजी राज्यांचा घरोबा आहे म्हणून राजे त्यांना सामान पुरवितात असे कारण मुस्ताफाखानास लिहुन शहाजी महाराजास विजापुरास धरून नेले...तहकिकात केल्यावर.. पातशाहाने शहाजी महाराजांचा सत्कार केला.व सदर बक्षीस दिली...बंगरूळ प्रांताची वेगळी मसलत सांगितली, शिरपाव दिल्हे.., त्यावरी शहाजी महाराजांनी राजश्री शिवाजी महाराजांना राजश्री सामराज पंत पेशवे व माणकोजी दहातोंडे सरनोबत व बाळाजी हरी मजलासी व कारकून व स्वारांचा जमाव देऊन पुण्यास पाठविले .
चिकित्सा = वरील वर्णनात रणदुल्ला खानाचा मुलगा न्हवता एवढाच गैरसमज दिसतो.. रणदुल्लाखानास रुस्तुमजमा नावाचा मुलगा होता. त्याला नालायक ठरवून कोकणात छोटीशी जहागीर देऊन अफजल खानाने रणदुल्लाखानची सगळी जहागीर आपल्याकडे घेतली...
२) कवींद्र परमानंदांच्या "अनुपुरान" - शहाजीच्या स्त्रिया बऱ्याच असूनही संभाजी, शिवाजी आणि जिजाऊ ने शहाजीचे हृदय काबीज केले होते... संभाजी पेक्षा शिवाजी वयाने धाकटा पण गुणाने फार मोठा म्हणून त्याज वर.. शहाजी महाराजांचा फार जीव होता... जेव्हा हा पुत्र झाला तेव्हा पासून ऐश्वर्य वृद्धींगतच होत होते...मग तो गुणवान मुलगा सात वर्षाचा झालेला पाहून तो मुळाक्षरे शिकण्यास योग्य झाला आहे असे शहाजी राजास वाटले. प्रधानांच्या समवयस्क पुत्रासह बुद्धिमान आणि स्पष्टोच्चार करणाऱ्या त्या पुत्राला गुरूच्या मांडीवर बसविले. गुरुजी जो पहिले अक्षर लिहिण्यास सांगतात तोच हा मुलगा दुसरे अक्षरसुद्धा लीहून दाखवीत असे. जेव्हा शिवाजीस बारावे वर्ष लागले तेव्हा दूरदर्शी शहाजींनी शिवाजीस बोलावून पुणे प्रांतावर अधिकारी नेमले नंतर काही हत्ती, घोडे व पाय दळ, पिदिजाद व विश्वासू अमात्य, त्याच प्रमाणे विख्यात अध्यापक, बिरुदे, उंच ध्वज, विपुल द्रव्य, त्याच प्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे दुसरे परिजन या समवेत त्या पुण्यशील शहाजी राजाने शुभदिनी पुणे प्रांती पाठविले .
३) मुधोळ संस्थानाचे घोरपडे यांची बखर - कंपिली बद्दल मजकूर आढळतो -  
४) जयराम पिंडे याच्या राधा विलास चंपू काव्यात -जिजाऊ - शिवाजीचा फारसा उल्लेख नाही. कारण हि दोघे पुणे जहागिरीत त्यावेळी आलेली होती. परंतु ग्रंथाच्या शेवटच्या भागात महत्व पूर्ण उल्लेख आलेला आहे..
.. - जसी चंपकेशी खुले फुलाजी| भली शोभली त्यास जाया जिजाई || जिचे कीर्तीचा चंबू जम्बुद्धीपाला | करी साउली माउलीसी मुलाला || ९६|| असो सर्वसाम्राज्यलक्ष्मी जयाची | तसी दुसरी श्री महाराजीयाची (शहाजी महाराज) || जिणे निर्मिलीसे असी एक पोहे| जिच्या नित्य दानोदकी विश्व पोहे ||९७|| टीकेचा धनी लेक ज्याचा शिवाजी | करी तो चहु पातशहाशी बाजी || तयाला रणामाजी हे एक माने | अरी जै गला घालूनी ये कमाने ||९९||"
.                   यावरून शहाजी - जिजाई यांचे भांडण न्हवते व शहाजीने जिजाई व शिवाजी यांचा त्याग केलेला न्हवता यात शंका उरत नाही. उलट संकटात पडलेल्या आपल्या धाकट्या मुलाला जवळचा आधार व मार्गदर्शक म्हणून शहाजीला आपल्यापासून तिला दूर करावी लागली होती. आणि तीही पत्नी व माता म्हणून तिच्यावर असलेली जवाबदारी पार पाडण्याकरिता पती विग्रहाला तयार झाली होती. 
५) शिवाजीस समकालीन कॉस्मा द गार्डा -
.." Life of the celebrated sevagy" - " sevagy had not completed twelve when his father gave him the command of 30 horses .... as sevagy was so young , he gave him as his tutor an old soldier and near relative salled neotogy... who kenw that sevagy was not only quick in action but liveli in carriage also, for with a clear and fair face, nature had given him the greatest perfections. specially the dark big eye......."
                               शिवाजी राज्यांना पुण्यास केव्हा पाठविले त्या बद्दल काही निरनिराळे समज आहेत. काही बखरकार सांगतात कि, दादोजी कोंडदेव कर्नाटकात भरणा करावयास गेले तेव्हा त्यांचे बरोबर शहाजी महाराजांनी शिवाजी - जिजाईस पाठविले. दादाजी कोंडदेव महजर व पत्रे २६ जानेवारी १६३८ ते २८ सप्टेबर १६३९ पर्यंतची उपलब्ध झालेली आहेत. त्यावरून या अवकाशात दादाजी आपल्या सुभावर मावळतच होते असे स्पष्ट होते. त्यानंतर २४ नवेंबरच्या फार्मानावरून इ.स. १६३९ च्या पावसाळ्या नंतर ते निघाले असावेत असे अनुमान काढणे भाग पडते. त्या नंतर दादाजीचा पत्र व्यवहार वगैरे इ.स. १६४० तील अद्यापि आढळलेला नाही. परंतु ते १६४० च्या पावसाळ्यानंतर मावळत आले असावेत. कारण पुन्हा इ.स. १६४१ च्या १४ जानेवारी पासून २१ मे १६४३ पर्यंतची पत्रे उपलब्ध आहेत. यावरून शिवाजी आपल्या बाराव्या वर्ष पर्यंत कर्नाटकात असल्याने ते दादाजी कोंडदेव बरोबर १६४० च्या अखेरपर्यंत तरी खास आलेले नाहीत. तसेच ज्या अर्थी शिवाजी राजा बरोबर मोठमोठे कारकून सेनापती पाठीवले होते त्या अर्थी दादाजी पंताच्या सोबतीचीही जरूर न्हवती. अर्थात शिवाजी- जिजाई यांना दादाजी कोंडादेवा बरोबर पाठविले हि केवळ काल्पनिक माहिती आहे. अर्थात ती चुकीची आहे.१६४३ नंतर शिवरायांची पत्रे आढळतात..ती त्यांच्या शिक्क्या निशी आहे..त्या अर्थी तो शिक्का जहागिरीवर नेमणूक करीत आहे या सबबीवर शिवाजीला मिळवून दिला असे होते. 
१६४२ च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का, झेंड्यासोबत...पेशवे, मुजुमदार, सबनीस, व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले...
अजूनही ज्यांना विस्तारित माहिती हवी असेल त्यांनी
श्री छत्रपती शिवाजी महाराज - वा .सी. बेंद्रे ह्यांच्या पुस्तकातील "शिवाजी - जीजामातेचे पुण्यात पुनरागमन " हे प्रकरण वाचावे.. त्यात सखोल चिकित्सा आलेली आहे.. पान क्रमांक ३७ ते ५३ - १६-१७ पाने निव्वळ ह्या विषया संबंधी चिकित्सा आलेली आहे.. जाणकारांनी स्वतः वाचून बघावे...   

 

Thursday, December 23, 2010

१६३६ पासून १६४२ पर्यंत चा पुणे प्रांत...

१६३६ साली जेव्हा शहाजी महाराज आदिलशाहीत आले.. त्या दरम्यान दादोजी कोंडदेव कुलकर्णी आणि कान्होजी नाईक जेधे..हे भेटीस गेले..(संदर्भ शिवभारत)  अथवा शहाजी महाराजांशी संधान साधले..
शहाजी महाराजांना आदिलशाही नवीन न्हवती.. त्यांनी त्या आधी देखील आदिलशाहीत १६२५ ते १६२८ मधील कालावधीत काम केले होते.. (त्या मूळे शहाजी महाराजांचे अनेक सरदारांशी चांगले असणे साहजिक आहे..) पुढे आम्ही तुमच्या कडे चांगली एकनिष्ठतेने नोकरी करू..असे कान्होजी नाईक जेधे आणि कृष्णाजी कुलकर्णीने सांगितले.. त्यावर.. शहाजी महाराजांनी ह्या दोहांना तहा नंतर आपल्या कडे मागून घेतले... (संदर्भ शिव भारत) (त्यात रणदुल्लाखान हा शहाजी महाराजांच्या जवळचा . कारण बराच कालावधी त्यांनी एकत्रित पणे मोघलांना लढाई दिली होती...त्या मूळे शहाजी महाराजांना रणदुल्लाखानाचा खूप मोठा पाठींबा होता..)
१६३६ च्या अखेरीस शहाजींनी दादाजीस आदिलशहा कडून मिळालेल्या नवीन सरंजामाच्या कारभारासाठी "मुनीम"रणदुल्लाखानाने त्यास सरंजामी सुभ्याचा "सुभेदार" नेमले..
१६२९-३० च्या कालावधीत आदिलशहाचा  मुरार जगदेव ह्याने पुणे लुटून जाळून "कसब्यावर गाढवाचा नांगर फिरवला" होता (त्या वेळेस शहाजी राजे. निजामशाही  कडून होते.. व आदिलशाहने शहाजी राज्यांचा बंदोबस्त  करण्यासाठी मुरार जगदेवला पुण्यावर पाठवले होते.त्याच दरम्यान जाधव रावांचा खून झाला व शहाजींनी मोघलानकडे जाण्याचा निर्णय घेतला .) . तसेच मधल्या काल खंडात पुण्यात मोठा दुष्काळ पडला होता.. त्या मूळे शहाजी महाराजांनी दादोजीस तो सर्व भाग परत सिंचन्यास सांगितले...
त्या प्रमाणेच तूर्तास शिवाजी आणि जिजाऊ ह्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी खेड शिवापूरची स्थापना शहाजी महाराजांनी दादोजीला करायला लावली .आणि स्वतः कंपिलीला  जाताच नवीन वाडे  बांधायचे कार्य हाती घेतले....
चौल भागातील अस्थिरते मूळे शहाजींनी शिवाजी व जिजाऊ ह्यांना १६३६ नंतर वर्षभर खेड शिवापूरला ठेवले...खेड शिवापुरातील मुक्कामात शिवाजी व जिजाऊ ह्यांच्या सरक्षानार्थ रघुनाथ पंत कोर्डे वगैरे मंडळी होती..त्या वेळेस दादाजी कोंडदेव कुलकर्णी कोंढाण्यावर  सुभेदार म्हणून राहत होते...; वर्षभरानी    जेव्हा कंपिलीला  वाडा बांधून पूर्ण झाला तेव्हा शहाजी महाराजांनी जिजाऊ व शिवराय ह्यांना तिकडे न्हेले...
पुढे शिवाजी महाराज व जिजाऊ पुण्यात कधी परत आले त्या बद्दल निरनिराळे समज  आढळतात...काही  बखरकार सांगतात , कि  दादोजी कोंडदेव कुलकर्णी कर्नाटकात भरणा भरावयास गेले असतांना त्यांच्याबरोबर शहाजी महाराजांनी शिवाजी व जिजाऊ ह्यांना  पुण्याला परत पाठवले.....परंतु.. दादाजी कोंडदेवांची महजर व पत्रे २६ जानेवारी १६३८ ते २८ सप्टेम्बर  १६३९ पर्यंतची उपलब्ध झालेली आहेत. या वरून या अवकाशात दादाजी आपल्या सुभ्यावर मावळातच होते असे स्पष्ट होते. त्यानंतर २४ नोव्हेंबर १६३९ चे एक फर्मान आहे. त्यातील मजकुरावरून दादाजी मोहसब घेऊन इ.स. १६३९ च्या पावसाळ्या नंतर निघाले असावेत असे अनुमान काढणे भाग पडते. त्या नंतर दादाजीचा पत्र व्यवहार वगैरे इ.स. १६४० तील अद्यापि आढळलेला नाही. परंतु ते १६४० च्या पावसाळ्या नंतर मावळात आले असावेत. कारण पुन्हा इ.स. १६४१ च्या १४ जानेवारी पासून २१ मे १६४३ पर्यंतची त्यांची पत्रे उपलब्ध आहेत. यावरून शिवाजी आपल्या बाराव्या वर्षापर्यंत कर्नाटकात असल्याने दादाजी कोंडदेव बरोबर १६४० च्या अखेरी पर्यंत तरी खास आलेले नाहीत. तसेच शिवाजी राजा बरोबर मोठमोठे कारकून सेनापती व पाठविले होते त्या अर्थी दादाजी पंतांच्या सोबतीची जरूर न्हवती. अर्थात शिवाजी- जिजाई यांना दादाजी कोंडदेव बरोबर पाठविले हि केवळ काल्पनिक माहिती आहे. अर्थात ती चुकीची आहे.

शिवाजी महाराज पुण्यात त्यांच्या वयाच्या कोणत्या वर्षी आपल्या जहागिरीत आले त्याबद्दल बखरकार व इतर तत्कालीन चरित्रकार यांच्यात मतैक  आहे. परंतु २-३ पत्रे प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातील एक शिवचरित्र खंड ३ मध्ये आले आहे व दुसरे पत्र राजवाडे खंड १५ त आले आहे. त्यांच्या तारखा चुकीच्या वाचनामुळे पहिल्या पत्राची २ डिसेंबर १६३८ व दुसऱ्या पत्राची तारीख २४ डिसेंबर १६३९ अशा दिल्या आहेत. या तारखा खऱ्या मानल्या तर शिवाजीचे इ.स. १६३८ तच पुण्याकडे येणे झाले असे होईल. पहिले पत्र मूळ पत्राच्या नकलेवरून छापले आहे . नकल करणाराने " तिस खमैसन अलफ" ऐवजी "तिस सलासीन अलफ " असे चुकीचे वाचून आपल्या नकलेखाली आपल्या उपयोगाकरिता वरील चुकीच्या शक मासतिथी काढून नोंद करून ठेवली आहे. ज्या अर्थी हि नोंद "सुरु सूद " वगैरे शेऱ्याखाली  केली आहे त्याअर्थी ती मूळ पत्रातील नाही आणि " शके १५६० सु|| तिस सलासीन अलफ बहुधान्य नाम संवत्सर १" अशी मिश्र तारीख देण्याची कोठेच पद्धत न्हवती. शिवाय हे पत्र प्रसिद्ध करणाऱ्या  संपादकाचा शेराही त्या पत्राच्या त्याच संग्रहातील दुसऱ्या नकलेवर जादा नोंद नाही असा आहे. राजवाडेंनी त्यांच्या खंडात तर मूळ पत्राचा फोटो दिला आहे.. पण त्यातही पहिले तर सु|| सन देतांना " सु|| खामसैन अबीन अलफ" असा दिला आहे. खामसैन  शब्द पाहता काही तरी "तिसा" सारखी अक्षरे दिसतात ती खोडून त्यावर खामसैन असे केले आहे. अजूनही बरेच विवेचन बेंद्रेंनी ह्या दोन पत्रांबद्दल दिले आहे. शेवटी त्यांनी ती दोन्ही पत्रे चुकीच्या तारखासहित असल्याचे सिद्ध केले आहे..पहिले पत्र ९ एप्रिल १६५९ चे आणि दुसरे पत्र हे १६४९ नंतरचे आहे..
तेच शिवाजी महाराजांची १६४३ नंतरची अस्सल पत्रे हि त्यांच्या शिक्क्यानिशी आहेत..ह्यावरून १६४२ ला शिवाजी व जिजाऊ पुणे प्रांती परत आलेत हे स्पष्ट होते.
......
सहा कलमी शकावलीत (आत्ता जो पुण्यात लाल महालामध्ये पुतळा आहे त्या देखाव्यासंबंधी असलेली काही माहिती आलेली आहे ती इथे देतो...)- " शके १५५७ युवा नाम संवत्सरी शहाजी राजे भोसले यासी बारा हजार फौजेची सरदारी इदलशाहीकडून झाली. सरंमजामास मुलुक दिल्हे त्यांत पुणे देश राजाकडे दिल्हा. राजांनी आपल्या तर्फेने दादाजी कोंडदेव मलठाणकर यांसी सुभा सांगून पुनियास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरला. शांती केली. मग सुभेदार यांनी कसब्याची व गावगांनाची प्रांतात वस्ती केली. कौलाचे  वर्ष दिल्हे. सहावे साली  तनखा घेतला राजे विजापूर प्रांती गेले" - [संदर्भ - सहा कलमी शकावली ., शीचप्र. , पृ. ७१]   (ह्या संदर्भ वरून...पुण्यावर जे काही सोन्याचा नांगर फिरवला गेला.. तो शहाजी राज्यांच्या आदेशाने फिरवला गेला हे स्पष्ट होते...तरीही काही लोकांनी तिथे खुद्द शहाजी राज्यांनाच अनुपस्थित केले आहे....)
    १६३६ ते १६४२ ह्या काळात दादोजी कोंडदेव कुलकर्णी ह्यांच्या वर प्रामुख्याने जवाबदारी होती ती पुणे परिसरातील कारभार सुरळीत करण्याचा...त्यात सर्वात मोठा अडसर होता तो म्हणजे बांदलांची स्वैर वर्तणूक... बांदल, खोपडे जबरदस्तीने दाइते  उकळत...आदिलशाही इस्लामी सरदारांनाही त्यांच्या या डोंगर दऱ्यांच्या भागात बंदोबस्त करणे जड होते. त्या मूळे दादाजीच्या कारस्थानांना आदिलशाहने पाठींबाच  दिला...
परंतु दादाजीला एकट्याला हे सर्व जमेना.. बांदलावर दादाजी कोंडदेव चालून गेले असता कृष्णाजी बांदलाने दादाजी ला नामोहरण केले...स्वार पिटून  काढले..दादोजीच्या घोड्याच्या  दांड्या तोडिल्या..(शेपटी कापली) तिथून दादोजी नामोहरण होऊन शिवपुरी आले.. व कान्होजी नाईक जेधेंना भेटून त्यांची मदत घेतली.. व त्यांच्या मदतीने बांदलांचा बंदोबस्त केल्याचे संदर्भ मिळतात...
सिलींबकर देशमुख  प्रकरण - १६३८ साली सिलींबकर देशमुख  घराण्यात वारसा हक्का बद्दल मलिक अंबरच्या आधीपासून भांडणे व खुणाखुनी चालू होती. १६३८ ला दादाजी कोंडदेव यांनी सिलीमकरांच्या बाजूने न्याय निवडा केला होता.. परंतु दुसऱ्या एका करीन्यातील संदर्भानुसार..तसेच दादाजी कोंडदेव ह्यांचा निकाल शिवाजी महाराजांनी १६५७ ला फिरवला ह्या दोन्ही संदर्भावरून दादाजींनी चुकीचा न्याय निवडा केला होता असे आढळून येते...
फुलाजी नाईक व बाजी मौजे भिडगावने येथे उतरले. तो सिलीमकर पळून गेले. त्यावर फुलाजी नाईकांनी आपले वर्तमान दादाजी पंतांकडे विदित केले, सिलीमकरांनी माझ्या वडिलाच मारा करून माझे वतन घेतले आहे, ते मला परत मिळावे असे दादाजी पंतांकडे मागणी केली. दादाजी पंतांनी सिलीमकरांना बोलावून चौकशी केली. व शेवटी निम्मे निम्मे वतन वाटून खाणे असा उपाय सुचवला.. पण फुलोजी नाईकांनी ह्याला स्पष्ट नकार दिला. त्या वेळी दादाजी पंतांनी मध्यस्थी टाकून फुलोजीला वळवण्याचा प्रयत्न केला. पण फुलोजी माघार घेण्यास तयार झाला नाही. ह्या वेळेस सिलीमकरांनी दादाजी पंतांना गैरवाका समजावून लाच दिल्हा. त्यावरून दादाजींनी सिलीमकरांचे अगत्य धरून फुलोजीस न्हेऊन बासाचा मार देऊन जीवे मारिले - (अर्थात ह्या अन्याय कारक न्याय निवाड्याची पुष्टी १६५७ ला शिवाजी महाराजांनी केलेल्या न्याय निवाड्या नुसार दादाजींचा निवडा रद्द बातल ठरवून हबाजी व बालाजी नाईकांना ते वतन परत मिळवून दिले..)
अश्या तर्हेची भांडणे खोपडे, सिलीम्बकर, निळकंठराव  यांच्याशी दादाजी कोंडदेव यांना कान्होजी नाईक जेधे यांना मदतीला घेऊन करावी लागली...बारा मावळच्या लावणी संचानिकारिता .. परंतु त्यात फारसे यश येऊन स्वास्थ्य व्हावे तेवढे झाले न्हवते...
दादाजी कोंडदेव १६३६ ते १६३९ च्या पावसाळ्या पर्यंत पुण्यात कोंढाण्यावर  होते.. नंतर ते १६३९ च्या पावसाळ्या नंतर कर्नाटकात भरणा भरावयास गेले हे आपण आधी पाहिलेलेच आहे.. व ते १६४० च्या अखेरीस परत आले हे हि आधी बघितलेले आहे...
ह्या दरम्यान..शहाजी महाराजांचे आपल्याच भाऊ बंधकीत असलेल्या घोरपडे खानदानाशी वैर झाले... रण दुल्ला खान मेल्यावर.. त्याच्या पुत्राला डावलून जहागीर मिळवणारा अफझल खानाने.. बाजी घोरपड्याला हाताशी धरून कारस्थाने चालू केली होतीत त्याचे प्रयोजन घोरपडे आणि भोसले यांच्यात वैर आले... हे बघून शहाजीला भावी काळाची चून चून लागली व त्यांनी दादाजीला पुण्यात राहण्यासाठी वाडे, महाल, इत्यादी व्यवस्था करण्यास सांगितली...
१६४० ला परत आल्यावर दादाजी कोंडदेव याने शहाजी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे पुण्यात रंग/ लाल  महाल बांधला..
पुढे १६४२ वर्षाशी संबंधित घडामोडी व शिवाजी , जिजाऊ यांचे पुनरागमन व त्यानंतर च्या घडामोडी पुढील लेखनातून पाहुत...

संदर्भ ग्रंथ - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
लेखक - वा.सी. बेंद्रे. १९७२  
बऱ्याच ठिकाणी वा.सी. बेंद्रेंनी  केलेली चिकित्सा जशी च्या तशी घेतलेली आहे.. तर काही ठिकाणी त्याचा सारांश घेतलेला आहे..तसेच लेखकाने स्वतःची काही मते..काही ठिकाणी कंसात टाकलेली आहेत..ह्याची नोंद घ्यावी..

Tuesday, December 21, 2010

शिवरायांचे बालपण --

या आधी आपण बघितलेच आहे कि शिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी वर झाला...
नंतर तीन चार महिन्यांनी  शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकन विधीयुक्त केले. पुढे वर्ष दीड वर्ष हे सर्व कुटुंब शिवनेरी वरच एकत्रित होते. "त्या नंतर १६३२ ते १६३६ ह्या दरम्यान शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला"...(संदर्भ - छत्रपती शिवाजी - सेतू माधवराव पगडी.). त्या मूळे १६३२ ते १६३६ मध्ये शहाजी महाराज आणि संभाजी राजे मोघालांशी लढण्यात मग्न होते...
पुढे १६३६ च्या उत्तरार्धात .. निजामशाही बुडाल्यावर ... शहाजी राजे आदिलशहा कडे बारा हजारी "फर्जंद " वजीर म्हणून गेले...तहा प्रमाणे शहाजी महाराजांना रानदुल्ला खानाबरोबर कर्नाटकात घाईने जावे लागले. तहा प्रमाणे गडकोटांचा ताबा मोगली सरदारांनी त्यांचे पश्चात घेतला व बादशहाच्या आज्ञे प्रमाणे जिजाई वगैरेंना शिवनेरी वरून आपल्या सर्व जीनगी वगैरेसह उतरू दिले. प्रथम जिजाबाईला "चौलात" ठेवायचा शहाजीचा प्रयत्न होता. परंतु पोर्तुगीजांनी तिला त्यांच्या हद्दीतून नेऊन इतरत्र ठेवण्याची सूचना केली. तेव्हा शहाजी राज्याने शिवाजी - जिजाई ला खेड (शिवापूर) ला पाठविले.. तिथे त्यांचा वर्षभर मुक्काम होता...खेड (शिवापूर) हे दादाजी कोंडदेवाने शहाजी महाराजांच्या आज्ञेवरून नुकतेच वसवले होते..
पुढे इ.स. १६३७ च्या अखेर जिजाई शिवाजीसह कर्नाटकात गेली असे कागदपत्रां वरून स्पष्ट होते. कर्नाटकात कंपिलीला  शहाजी राज्यांच्या सोबत १६३७ ते १६४२ साला पर्यंत शिवाजी आणि जिजाऊ हे  तिथेच होते... तिथे शहाजी महाराजांनी शिवाजी ७ वर्षाचा झाल्यावर.. अक्षर ओळख व जुजबी गणित त्यावेळच्या  पद्धतीने शिकवले. त्या काळी एवढेच काय ते शिक्षण "अध्ययना" खाली त्रैवर्णिकांना दिले जात असे. परंतु वडिलांच्या व्यावहारिक अनुभवाचा मुलांना पूर्ण वाटा घेता येत होता. वैश्यांना आपल्या हिशोबा पुरता लेखन वाचनाचा सराव असे. क्षत्रिय  आणि ब्राह्मणांना अक्षर ओळखी नंतर  , जर त्यात धंदा रोजगार करावयाचा असेल तरच तो या संस्कारानंतर अधिक लेखन वाचनाचा सराव करी..अन्यथा  वंशातील मोठ्या  माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्या कडून पारंपारिक कला कौशल्य शिकत असे ..
त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी महादेव भटाकडून अक्षर ओळख करून घेतली, व तलवारबाजी, घोडेस्वारी तश्याच अन्य कला त्या त्या क्षेत्रात माहीर असणाऱ्या व्यक्तींकडून याच काळात घेतले..
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे.. राजनीती चे डाव पेच अथवा.. राज कारभाराची कार्य पद्धती.. हे सर्व शिवाजी महाराजांनी ह्या काळात आपले वडील शहाजी महाराज व वडील बंधू संभाजी महाराज ह्यांच्या कडून शिकले...
याच दरम्यान १६४० च्या अखेरीस शिवाजी महाराज यांचे लग्न निम्बालकर पवार यांच्या "जिऊबाई" नावाच्या मुलीशी झाले. तिचे सासरचे नाव "सईबाई" असे ठेविले.
पुढे १६४२ साली...शहाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीतील कारस्थाने वाढली...रन्दुल्लाखान मेल्यावर त्याचा पोरगा कम कर्तुत्वी निघाल्याने अफजल खानाला त्याची जहागीर मिळाली.व त्याने बाजी घोरपड्या सारखे सरदार गोळा करून शहाजी महाराजांविरुद्ध कारस्थान रचले..त्या नुसार.. शहाजी महाराजांचा बराच प्रदेश त्यांच्या कडून आदिलशाहने काढून घेतला..व त्यांचेच भाऊ बंद बाजी घोरपड्यास दिला ....तसेच शहाजी राजे ह्यांचे मुतालिक दादाजी कोंडदेव ह्यांची बाही बाजी घोरपाड्याने कापली . हे सर्व बघून आदिलशाही तील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र शिजतेय हे बघून शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला.. त्या सोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो अश्या आशयाचे बोलणे त्याने आदिला शहशी  लावून ठेवले... १६४२ च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का, झेंड्या सोबत...पेशवे, मुजुमदार, सबनीस, व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले...
ह्या मूळे शहाजी राज मोघालांशी संधान साधतोय कि काय ह्याची भीती   आदिलाशाहाला झाली त्या मूळे आदिलशाहने शहाजीशी चाललेल्या वादावर पडदा टाकत.. शहाजी राज्यांना काढून घेतलेल्या जहागिरी पेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला...
१६४४  साली आदिलशाहने शहाजी राज्यांची आधीच्या (काढून घेतलेल्या )  ४ लक्ष जहागिरी ऐवजी ५ लाखाचा सुभा बंगलोर दिला...व तिकडे रवाना केले..(अर्थात शहाजी राज्यान सारख्या प्रबळ सरदाराचे मोघलानकडे जाने चांगले नाही ह्या भीतीने  शहाजी राज्यांशी आदिलशाहने जुळवून घेतले.. व इकडे मोघालांशी संधान साधायला नको म्हणून तिकडे कर्नाटकात बंगरूळला  रवाना केले...
इथे शिवाजी महाराजांना पुणे प्रांती पाठवून शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजी राज्याकडून त्या प्रकारची बंडयुक्त  कार्य करण्याचे आदेश पाठवले होते...
परिस्थितीचा फायदा उठवण्यात शहाजी राजे पुन्हा  एकदा यशस्वी झाले...
अवघ्या १२-१३ व्या वर्षी शिवाजी राज्यांना स्वतंत्र वाट चाल करावी लागली पण...स्वतः शहाजी महाराज व शिवाजी महाराजांचे वडील बंधू संभाजी महाराजांवर देखील याच वयोमानात अश्या प्रकारची जवाबदारी अंगी पडली होती हे नमूद करण्यासारखे आहे...तर शहाजी महाराजांना त्यांच्या लहान पणी (१० व्या वर्षी ) अश्याच प्रकारे जवाबदारी पडली असतांना त्यांना त्यांचे थोरले चुलत बंधू संभाजी राजे ह्यांचा आश्रय अथवा मार्ग दर्शन मिळाले.. तर.. शिवाजी राज्यांचे वडील बंधू संभाजी राजे यांना तर अश्या (९ व्या वर्षी ) वेळेत स्वतः शहाजी राज्यांचे मार्ग दर्शन मिळाले..
तर शिवरायांना मार्ग दर्शन मिळाले ते जिजाऊन्चे..त्या बाबत सविस्तर माहिती पुढे घेऊयात...
संदर्भ ग्रंथ - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
लेखक - वा.सी. बेंद्रे. १९७२
संदर्भ ग्रंथ- chatrapati Shivaji- सेतू माधवराव पगडी.

Saturday, December 18, 2010

शिवरायांचा जन्म

शिवरायांचा जन्म
शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० सालचा शिवनेरी वरचा...वेगवेगळ्या बखरीन मध्ये, शकावलीत, प्रामुख्याने २ प्रवाद दिसून येतात.. एक जुनी style ती म्हणजे १६२७ सालचा शिव जन्म मानणारी...
सभासद बखर - जन्म तारखेची नोंद नाही...
एक्याण्णव कलमी बखर - वैशाख मास शुद्ध ४ चंद्रावरी १५५९ (नेमके १५५९ आहे कि १५४९ / १५५१ असे आहे ह्या बाबत सांशकता आहे..) क्षयणाम संवत्सरी
चिटणीस बखर - शके १५४९ प्रभाव नाम संवास्तरे वैशाख शुद्ध २ गुरुवार
मराठी साम्राज्याच्या छोटी बखर - १५४९ क्षयनाम संवास्तरे माहे वैशाख शुद्ध ५ चंद्रवासरी
शिवदिग्विजय - शके १५४९ प्रभाव संवत्सर वैशाख शुद्ध २ गुरुवासरे
शिवाजी प्रताप - तीस शके १५४९ रक्ताक्षी नाम संवास्तरे
शेडगावकर भोसले बखर - शके १५४९ प्रभावनाम संवत्सरे फसली सन १०३७ मिती वैशाख शुद्ध ३ रोजी शनवार
पंतप्रतिनिधी बखरीत - शके १५४९ शके प्रभाव नाम संवत्सर वैशाख शुद्ध १५ इंदुवारी
न्यायशास्त्री पंडितराव बखर - शालिवाहन शके १५४९ प्रभावनामे संवत्सरे 

दुसरा प्रवाद - १६३० सालच्या जन्माचा आहे....
जेधे शकावली - शके १५५१ शुक्ल संवत्सर, फाल्गुन वद्या त्रितीय शुक्रवार (१९ फेब्रुवारी १६३०) नक्षत्र हस्त घाटी १८ पळे ३१ गड ५ पळे ये दिवसी
शिवापुरकर देशपांडे वहीतील शकावलीत - शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी फाल्गुन वद्या ३ शुक्रवार
forbes collection - जेधे शकावली सारखेच..
कवींद्र परामानंदांच्या अनुपुरणात - शालिवाहन शके १५५१ शुक्लानाम सवत्सरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्या तृतीयेला रात्री..
शिवराम ज्योतिषी यांनी केलेली शिवाजी महाराजांच्या कुंडली नुसार - संवत १६८६ (शके १५५१) फाल्गुन वद्या ३ शुक्र उ. घाटी ३०/९ राजा शिवाजी जन्म : र. १०/२३ ल. ४/२९.

अश्या प्रकारे वेगवेगळी मत मतांतरे आहेत... तर.. एकंदर सर्वांचा अभ्यास करतांना... इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे यांच्या मता नुसार.. निव्वळ जन्म तिथी बाबत काय उल्लेख आलेला आहे हे ग्राह्य न पकडता.. त्त्या संदभात इतर उल्लेखही तपासून त्याची ग्राह्यता आग्रह्यता तपासावी...
 -- १६२७ सालचा जन्म बऱ्याच ठिकाणी देण्यात आलेला आहे.. मूळ चिटणीस बखरीतील जे वर्णन आलेले आहे त्या नंतरच्या बखरकारांनी कमी जास्त प्रमाणात तेच वर्णन उचलून धरलेले आढळते...
पण १६२७ सालचा जन्म गृहीत धरल्यास.. तो शिवनेरी वर झाला असेल का असा प्रश्न उभा ठाकतो.. कारण.. सर्वच बखरीत जिजाई ६-७ महिन्यांची गरोदर असतांना ती जाधवरावांच्या काही हालचालींमुळे शिवनेरीस येऊन राहिली असे लिहितात.
जाधवराव (जिजाऊनचे  वडील ) इ.स. १६२१ मध्ये निजामशाही सोडून मोघलांकडे गेले..मध्ये १६२३ ला ते शहाजहानच्या बंडात सामील होऊन मलिक अंबर  कडे काही दिवा खुर्रमचा हस्तक म्हणून होते.. पण तिथे खंडागळेचे प्रकरण उद्भवले त्यात जाधवरावांचा मोठा मुलगा मारला गेला व शहाजी राजेंचा सर्वात वडील चुलत भाऊ संभाजीही मारला गेला.. तेव्हा शहाजी चुलत भावाच्या मदतीस गेले जखमी होऊन पडले.. ह्या प्रकरणा मूळे जाधावारावांना परत खुर्रमच्या गोठ्यात परतावे लागले...त्यानंतर  ते परत १६२९ ला आले....या दरम्यान भातवाडीच्या लढ्यात इ.स. १६२४-१६२५ या कालावधीत शहाजी महाराज आणि जाधवरावांचा आमना सामना झाला असावा अशीही शक्यता राहत नाही कारण जाधवराव त्या वेळेस युद्धात सामील न होता आपल्या जहागिरीत जाऊन बसले होते.. खुर्रम उत्तर हिंदुस्थानात जाताच जाधवराव परत मोगली चाकरीत शिरले.
  आत्ता शहाजी राज्यान बद्दल माहिती घेऊयात १६२३ च्या खंडागळे प्रकरण मूळे जाधव आणि भोसले घराण्यात वित्तूष्टे  आली होती.. हे मागे बघितले..पुढे शहाजी राजे भातवाडीच्या लढाई (१६२४-२५) नंतर भाऊ बंधकी मूळे निजामशाही सोडून इ.स. १६२५ अखेर आदिलाशाहाची "सरलश्करी" पत्करली. हि सरलश्करी शहाजी राजांनी १६२८ च्या पावसाळ्या पर्यंत केली ह्यास कागद पत्रांची पुष्टी मिळते...अर्थात अश्या काळात आदिलशहा कडे असतांना १६२७ लाच जिजाऊ ना शिवनेरी (निजामशाहीत ) वर ठेवणे अशक्य आहे..
पुढे बखरींच्याच वर्णना नुसार.. जिजाऊ व ३-४ वर्षाचा मुलगा संभाजी शहाजी महाराजांबरोबर विजापुरी गेल्याचे आढळते..मग १६२७ चाच जन्म  गृहीत धरायचा झाल्यास तो विजापूरचा अथवा कर्नाटकातील धरायला लागतो..
परंतु जिजाऊना संभाजी राज्यांनंतर ४ मूले अल्पजीवी निपजली. यातील निदान २ तरी १६२५ - १६२८ च्या विजापुरी मुक्कामातील असली पाहिजेत या वरून जिजाऊ शहाजी महाराजान सोबतच विजापूरला गेल्या हे सिद्ध होते..व शिवाजीचा जन्म १६२८ च्या पावसाळ्या नंतरच ग्राह्य पकडावा लागतो...
तसेच निजामशाही डूबत आहे हे बघून शहाजी राज्यांनी अनेक मराठा सरदारांना एकत्रित करून बंडाळी उठवली..ती १६२९ ला.. म्हणजे १६२८ ला आदिलशाही सोडून ते निजामशाही कडे आले वा १६२९ ला बंड उठवले.. त्यात जाधवरावही सहभागी होते.. अर्थात १६२३ च्या खंडागळे  प्रकारानंतर जाधवराव - शहाजी जिजाऊ यांचा जो काही संबंध आला असावा तो १६२९ या सालीच.. नंतर august मध्ये १६२९ लाच जाधवरावांना मारण्यात आले..म्हणजे त्या नंतर संबंध येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही... वा त्या आधी त्यांच्या भेटीची शक्यताच न्हवती म्हणून तो संबंध १६२९ या सालचाच असावा..पुढे जाधावरावांना धोक्याने मारल्या मूळे शहाजी राजांनी निजामशाही सोडण्याचे ठरवले.. वा त्यांनी आपल्या जहागिरीत जाऊन मोघालांशी संधान साधले.. ह्या दरम्यानच शिवनेरी वरील निजामी चाकरीत असलेला वैभवशाली विजयराज ह्याच्या मुलीशी (जयंती ) आपला मुलगा संभाजी ह्याचे विवाह लावून दिले... तो काळ १६२९ नोव्हेंबर चा  पहिला पंधरवडा  ... आणि लग्न लावून दिल्यावर.. शहाजी राजे दुसऱ्या पंधरवड्यात मोगलांची पंचहजारी सरंजाम वा संभाजीला हजारी घेतली...संभाजीच्या लग्नाच्या वेळेस जिजाऊ ६-७ महिन्याची गरोदर असावी असा तर्क निघतो...व त्या मूळे आपल्या समध्या कडे जिजाऊ ना संरक्षणास  ठेवले हा तर्क जास्त संयुक्तिक आहे...
त्यामुळे जाधवराव पाठीमागे लागले म्हणून न्हवे तर जाधवरावांचा खून झाल्यामुळे निजामी मंत्र्याच्या सुडार्थ शहाजी महाराजांनी मोघलांना जाऊन मिळायचे ठरवले तेव्हा संभाजीचे लग्न लाऊन जिजाऊना  शिवनेरी ठेवले...
जिजाऊनच्या  भावाचा म्हेवणा ..आणि मुलगा संभाजी ह्याचा सासरा.विजय राजा .. असा दुहेरी संबंध जोडला गेल्याने.. जिजाऊनच्या संरक्षणाची संपूर्ण खात्री पटल्यावर शहाजी महाराज मोघलांना जाऊन मिळाले...
अश्या प्रकारे.. १६३० साली शिवनेरी वरच शिवरायांचा जन्म झाला असा निष्कर्ष काढता येतो....
आत्ता पुढून मागे तपासणी करायची झाल्यास...
बखरींच्या वर्णनानुसार..निजामशाही बुडाल्यावर शहाजी राजे आदिलशहा कडे बारा हजारी 'फर्जंद" वजीर म्हणून गेले व आपल्या मुलाला व पत्नीला त्यांनी बोलावले त्यावेळी शिवाजी ७ वर्षाचा होऊन गेला होता ...आदिलशहा सोबत हा करार शहाजी महाराजांनी १६३६ च्या उत्तरार्धात केला.. त्या वरून ७ वर्षे आधी म्हणजे १६२९- १६३० चा पूर्वार्ध ह्या दरम्यान शिवाजीचा जन्म असावा असा तर्क निघतो..\
पुढे.. परत इ.स. १६४२ ला आदिलशाहीत आपलं धर सुटत आहे हे बघून शहाजी राजांनी शिवाजी व जिजाई ला १६४२ साली पावसाळ्या नंतर पुण्यात रवाना केले..त्या वेळेस शिवाजीचे वय वर्षे १२ होते..परत एकदा ह्यानुसार १६३० चाच तर्क निघतो...
बखरीन नुसार.. दादाजी कोंडदेव वारले तेव्हा शिवाजी १७ वर्षाचे होते..दादोजींचा मृत्यू काल १६४७ मार्च नंतर जुलै पूर्वीचा दिलेला आहे.. ह्या वरून परत एकदा जन्म साल १६३० बरोबर ठरते.
अश्या अनेक गोष्टींची पडताळणी करून वा.सी. बेन्द्रेंनी शिव जन्म तारीख १९ फेब्रुवारी १६३० अशी ठरवलेली आहे...
संदर्भ ग्रंथ - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
लेखक - वा.सी. बेंद्रे. १९७२  प्रकरण दुसरे - शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण..पान क्रमांक १७-३७